लाडकी बहीण योजने अंतर्गत अंगणवाडी सेविकांना मानधन लवकरच मिळणार !
Ladki Bahin Workers' Honorarium Soon!
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज भरलेल्या 3,283 अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मानधन मिळाले नव्हते. त्यासाठी 1 कोटी 37 लाख 77 हजार 700 रुपये एवढा निधी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडे जमा झाला आहे. लवकरच हा निधी सेविका आणि मदतनीसांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज भरलेल्या सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 50 रुपये मानधन मिळणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, अर्ज भरून तब्बल पाच महिने उलटून गेले, तरीही मानधन मिळाले नव्हते. त्यामुळे सेविकांमध्ये नाराजी होती. अखेर शासनाने याची दखल घेऊन मानधनाची रक्कम मंजूर केली आहे.
जिल्ह्यात 3,079 अंगणवाडी सेविका आणि 204 मदतनीस यांनी 2,79,438 अर्ज भरले होते. त्यातील 2,75,554 अर्ज महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाले. याबाबत जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने 1 कोटी 37 लाख 77 हजार 700 रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार हा निधी मंजूर होऊन जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या तो सेविकांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच हा निधी सेविका आणि मदतनीसांच्या खात्यात जमा होणार आहे.
तीन हजाराहून अधिक सेविकांचे अर्ज मंजूर झाले असून, त्यासाठी 1 कोटी 37 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शासनाने यासंबंधी प्रस्ताव स्वीकारून निधी वितरित केला आहे. आता लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या खात्यात मानधन जमा होईल.