‘पवित्र’ संकेतस्थळाद्वारे १०९९ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली !!
1,099 Teachers Appointed Through 'Pavitra' Portal!!
मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारच्या ‘पवित्र’ संकेतस्थळाद्वारे १०९९ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने १३४२ शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती, त्यापैकी बहुतेक पदे भरली असून नियुक्ती आदेश जारी करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि गुजराती माध्यमांच्या शाळांमध्ये सुमारे ३ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, मागील काही वर्षांत शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता.
महापालिकेच्या शाळांमध्ये कोविडनंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. विविध शिक्षण मंडळांच्या शाळा आणि शैक्षणिक सुविधा वाढल्यामुळे पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीबाबत मागणी वाढली होती, त्यामुळे १३४२ शिक्षक भरतीसाठी गेल्या वर्षी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
काही शिक्षकांनी दिला नाही प्रतिसाद
भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांनी सहभाग घेतला असला तरी, काही उमेदवारांनी पालिकेच्या पत्रांना प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे फक्त १०९९ शिक्षकांची नियुक्ती पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित जागांसाठी पालिकेला खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षक मिळाले असून, त्यांचीही लवकरच शाळांमध्ये नियुक्ती केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.