एमपीएससीच्या दिरंगाईमुळे राज्यसेवा उमेदवारांमध्ये नाराजी!
MPSC Delays Frustrate State Service Aspirants!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा २०२३ परीक्षेचा निकाल तीन महिन्यांपूर्वी जाहीर केला. त्यानंतर अपिल वैद्यकीय तपासणीही पार पडली. मात्र, आयोगाच्या संथ कारभारामुळे पुढील संपूर्ण भरती प्रक्रिया अद्यापही रखडली आहे. यामुळे अनेक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी निर्माण झाली आहे.
निकाल जाहीर होऊन तीन महिने उलटले तरी उमेदवारांना पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. तसेच तात्पुरती निवड यादी जाहीर करणे, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय उपलब्ध करून देणे आणि नियुक्ती संदर्भातील इतर महत्त्वाच्या प्रक्रिया थांबलेल्या आहेत. ही संपूर्ण दिरंगाई उमेदवारांसाठी तणावाचे कारण ठरत आहे.
एकाच परीक्षेसाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याने उमेदवारांचा संयम सुटत चालला आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करून, परीक्षा देऊन, उत्तीर्ण होऊनही अंतिम नियुक्ती लांबणीवर पडत असल्याने परीक्षार्थी हताश झाले आहेत. राज्यसेवेसारख्या प्रतिष्ठित परीक्षेसाठी एवढी विलंब प्रक्रिया होणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. उमेदवार आता या दिरंगाईला कंटाळून आयोगाने लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करत आहेत.