लाडक्या भाऊ-बहिणींना कार्यमुक्ती, प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ नाही!!
Beloved Brothers and Sisters Relieved, No Extension for Trainees!!
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा कार्यकाळ संपत आला असून, प्रशासनाने त्यांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण संपल्याच्या दिनांकास कार्यमुक्त करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ही योजना जाहीर करून महापालिकेत जवळपास २५० प्रशिक्षणार्थींची नियुक्ती केली होती. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी आता संपत आला आहे. काहींची मुदत फेब्रुवारीअखेर, तर काहींची मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. या प्रशिक्षणार्थींनी मुदतवाढ मिळावी, यासाठी शासन आणि प्रशासनाकडे मागणी केली असली तरी, प्रशासनाने यास स्पष्ट नकार दिला आहे.
महापालिका आयुक्तांनी विभागप्रमुखांना कोणत्याही परिस्थितीत प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ देऊ नये तसेच मानधनावर नियुक्तीबाबत प्रस्ताव पाठवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, मुदत संपल्यानंतर प्रशिक्षणार्थींची कार्यमुक्ती झाल्याचा अहवाल प्रशासनास सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आदेश न पाळल्यास विभागप्रमुखांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. जर कोणत्याही विभागाने मुदतवाढ दिली किंवा मानधनावर नियुक्तीचा प्रस्ताव सादर केला, तर त्या विभागप्रमुखांवर कारवाई होणार आहे. कार्यमुक्तीनंतर विभागप्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन कामकाजाची योग्य पुनर्रचना करावी, असे निर्देशही प्रशासनाने जारी केले आहेत.