‘नीट एमडीएस’ इंटर्नशिपसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत!!
'NEET MDS' Internship Deadline Until March 31!!
एमडीएस ही दंतवैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी असून, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट एमडीएस’ परीक्षा घेतली जाणार आहे. दंत वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी असलेले आणि एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केलेले ‘बीडीएस’ पदवीधर या परीक्षेस पात्र ठरतात. तसेच, जे विद्यार्थी ‘एमडीएस’च्या कट ऑफ डेटपूर्वी इंटर्नशिप पूर्ण करणार आहेत, तेही पात्र राहतील, असे ‘एनबीईएमएस’ने स्पष्ट केले आहे. इच्छुक उमेदवारांनी ३१ मार्चपर्यंत इंटर्नशिप पूर्ण करणे आवश्यक आहे.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसमार्फत ही परीक्षा १९ एप्रिल रोजी घेतली जाणार असून, प्रवेश प्रक्रियेसाठी १८ फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांना १० मार्चपर्यंत अर्ज करता येईल. अर्जामध्ये काही बदल करायचा असल्यास १४ ते १७ मार्चदरम्यान सुधारणा करण्याची संधी दिली जाणार आहे.
परीक्षा शुल्क खुल्या, ओबीसी आणि ईडब्लूएस श्रेणीसाठी ३,५०० रुपये, तर एससी, एसटी आणि पीडब्लूडी उमेदवारांसाठी २,५०० रुपये आहे. अर्जात कोणतीही चूक झाल्यास, २७ ते ३१ मार्चदरम्यान दुरुस्तीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. परीक्षा संगणक आधारित पद्धतीने होणार असून, १५ एप्रिल रोजी हॉल तिकीट उपलब्ध होतील. या परीक्षेचा निकाल १९ मेपर्यंत जाहीर केला जाईल, असे ‘एनबीईएमएस’ने स्पष्ट केले आहे.