अंगणवाडी सेविकांना अपुरा भत्ता!!
Anganwadi Workers Receive Insufficient Allowance!!
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून एकूण ४ कोटी ४४ लाख ४७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाने केवळ २ कोटी ४२ लाख ८८ हजार ४५० रुपये इतकाच निधी वितरित केला आहे. परिणामी, हा निधी सेविकांमध्ये कसा विभागायचा, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
राज्यभरातील ३१ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील १,७६९ पात्र अर्जदारांना दोन कोटी ४२ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र, उर्वरित अर्जांसाठी निधी कसा उपलब्ध करायचा, याबाबत कोणत्याही सूचनांचा अभाव असल्याने प्रशासन अडचणीत आले आहे.
शासनाच्या निधी कपातीमुळे सेविकांमध्ये नाराजी
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याने योजनेसाठी आपापल्या मागण्या शासनाला पाठवल्या होत्या. मात्र, शासनस्तरावर त्या प्रस्तावांमध्ये कपात केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयुएलएम) कर्मचारी, ग्रामसेवक, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून तब्बल ८ लाख ८८ हजार ९४२ अर्ज भरले गेले होते.
प्रत्येक अर्जासाठी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे जिल्ह्यातून ४ कोटी ४४ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, अंतिम पात्र अर्जदारांची संख्या निश्चित झाल्यानंतर अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांनी भरलेल्या चार लाख ८५ हजार अर्जांसाठीच निधी वितरित करण्यात आला.
सात महिन्यांनंतरही सेविकांना प्रतीक्षा
विधानसभा निवडणुकीपूर्वी पात्र महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने घोषित केले होते. मात्र, ग्रामीण भागात अर्ज भरताना सेविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. बहुतांश वेळा ऑफलाइन माहिती गोळा करून रात्री उशिरा किंवा पहाटे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे काम करावे लागले.
ऑगस्ट महिन्यात लाभ वाटप सुरू झाले असले तरी सेविकांना आपला मेहनत भत्ता मिळण्यासाठी तब्बल सात महिने लागले, अशी नाराजी काही सेविकांनी व्यक्त केली आहे.