संगणक परिचालकांचे चार महिन्यांपासून मानधन रखडले !
Computer Operators' Honorarium Delayed for Four Months !
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये नियुक्त संगणक परिचालक गेल्या चार महिन्यांपासून मानधनाविना अडचणीत सापडले आहेत. शासनाकडून निधी मंजूर होऊनही अद्याप त्यांचे मानधन मिळालेले नाही, त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना महत्त्वाचे दाखले, ई-ग्राम स्वराज, सीएससी ट्रान्झेक्शन, आयुष्मान कार्ड, जन्म-मृत्यू दाखले, ई-श्रम कार्ड यांसारखी विविध ऑनलाईन व ऑफलाईन कामे संगणक परिचालकांकडून केली जातात. मात्र, एवढे महत्त्वाचे काम करूनही त्यांना तुटपुंजे मानधन मिळते, तेही वेळेवर नाही.
शासनाचा निधी अडकला कुठे?
संगणक परिचालकांचे मानधन ग्रामपंचायतीच्या १५व्या वित्त आयोगातील प्रशासकीय खर्चातून दिले जाते. हे पैसे जिल्हास्तरावरून राज्य शासनाकडे पाठवले जातात आणि त्यानंतर संबंधित कंपनीकडे वळवले जातात. मात्र, हा निधी अडकला कुठे, हे स्पष्ट नाही.
उसनवारीवर जीवन जगण्याची वेळ
मानधन मिळत नसल्याने संगणक परिचालकांना उसनवारी करून कुटुंब चालवावे लागत आहे. शासनाच्या हलगर्जीपणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या संगणक परिचालकांनी तातडीने मानधन मिळावे, अशी मागणी केली आहे.