TET चा निकाल जाहीर ;शिक्षक पात्रता परीक्षेत-अवघे ३.३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण!!
Teacher Eligibility Test Results Announcement!!
राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) निकाल जाहीर झाले असून, परीक्षेचा यंदाचा निकाल अत्यंत कमी टक्केवारीने लागला आहे. ही परीक्षा १० नोव्हेंबर २०२4 रोजी घेण्यात आली होती. पहिली ते आठवी इयत्तेसाठी शिक्षक म्हणून पात्र ठरण्यासाठी घेतल्या गेलेल्या या परीक्षेत एकूण ३ लाख ५३ हजार ९५३ परीक्षार्थ्यांपैकी केवळ ११ हजार १६८ परीक्षार्थींनी यश मिळवले असून, हे प्रमाण केवळ ३.३८ टक्के इतके आहे.
टीईटी परीक्षा ही सरकारी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक किमान पात्रता परीक्षा असून, बीएड किंवा एमएड केलेले उमेदवारच ही परीक्षा देऊ शकतात. राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या या परीक्षेतील पेपर १ आणि पेपर २ चे अंतिम निकाल १४ फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आले. पहिली ते पाचवी गटासाठीच्या पेपर १ साठी १ लाख ५२ हजार ६०५ जणांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी फक्त ४७०९ शिक्षक उत्तीर्ण झाले. सहावी ते आठवी गटासाठीच्या गणित व विज्ञान विषयाच्या पेपर २ साठी ७५ हजार ५९९ शिक्षकांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी फक्त २४१४ शिक्षकांना यश मिळाले. तसेच, सामाजिक शास्त्र विषयाच्या पेपर २ साठी १ लाख २५ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी फक्त ४०४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या अत्यंत कमी निकालामुळे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत तसेच परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.