नवीन शैक्षणिक वर्षात पालकांना स्कूल बस भाडेवाढीचा धक्का ; बस भाडे १८% ने वाढणार !

School Bus Fare to Rise by 18% from June?

नवीन शैक्षणिक वर्षात स्कूल बसच्या भाड्यात १८ टक्क्यांची वाढ होणार असल्याने पालकांची चिंताआणि त्यावर चर्चा सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या नियमांचे पालन, बसच्या सुविधांमध्ये सुधारणा, देखभाल, दुरुस्ती, इंधन आणि कर्मचार्‍यांच्या खर्चामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे स्कूल बस संघटनांचे म्हणणे आहे. तथापि, प्रस्तावित भाडेवाढीमुळे पालकांना काही प्रश्न निर्माण होत आहेत, विशेषतः ‘विद्यार्थी सुरक्षे’चे ध्येय साध्य होईल का, या संदर्भात.

School Bus Fare to Rise by 18% from June?

मुंबईतील स्कूल बस युनियनने राज्यभरातील सर्व शाळांना १८% भाडेवाढ प्रस्तावित केली आहे. मार्चमध्ये या विषयावर अंतिम निर्णय घेतला जाईल. स्कूल बसचे दर दरवर्षी शाळेच्या नियमानुसार आणि शाळेच्या प्रशासन आणि पालकांच्या अपेक्षांनुसार ठरवले जातात. मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली पालक, शिक्षक समिती, आरटीओ अधिकारी आणि बस ऑपरेटर यांची कमिटी यावर्षी मार्च महिन्यात बसच्या भाड्याबाबत चर्चा करणार आहे. बस सेवा संबंधी नियम, बसच्या प्रकार, बसची क्षमता आणि मार्गाच्या अंतराचा विचार केला जातो, त्यामुळे प्रत्येक शाळेचे भाडे वेगवेगळे असतात.

साधारणपणे मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी भाडे तुलनेने समान असते, परंतु आंतरराष्ट्रीय शाळांसाठी भाडे अधिक असते कारण त्यांची सेवा मागणी वेगळी असते. सध्या शाळांमध्ये ८०० रुपये ते ३००० रुपये प्रती महिना बस फी आकारली जाते.

जर स्कूल बस कमिटीने प्रस्तावित भाडेवाढीला मान्यता दिली, तर या फीमध्ये ९४५ रुपये ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीमुळे पालकांचे खिसे अजून हलके होणार असल्याने त्यांच्या मनात चिंता आहे. पालकांकडून याविरोधात विरोध व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच, मुंबई सेंट्रल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ७०० पेक्षा जास्त स्कूल बसची तपासणी केली आहे. या कारवाईत ११ लाख ८३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आरटीओच्या हद्दीत ८४० नोंदणीकृत स्कूल बस आहेत. तसेच, इतर वाहनांतूनही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते आणि आरटीओ नियमितपणे त्या सर्व वाहनांची तपासणी करतो.

स्कूल बससाठी काही नियम
परवान्यासाठी १००० रुपये नोंदणी शुल्क.
प्रति सीट १०० रुपये वार्षिक शुल्क आरटीओकडे भरावे लागतात.
वाहनाचा रंग पिवळा असावा.
वाहनाच्या पुढे आणि मागे ‘स्कूल बस’ लिहिलेले असावे.
वाहनाच्या खिडकीखाली शाळेचे नाव विटकरी रंगाच्या पट्ट्यावर लिहिलेले असावे.

Leave A Reply

Your email address will not be published.