लाडकी बहिण योजनेचा फक्त या महिलांना मिळणार लाभ ! ज्यांचे मासिक उत्पन्न २०,००० रू. च्या आत आहे .
Major Update on Eligibility of Ladki Bahin Yojana!
राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांतील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जातात. जुलै २०२३ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, आतापर्यंत सात हफ्ते जमा करण्यात आले आहेत. आता फेब्रुवारीचा हफ्ताही लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
नियम आणि अटी काय आहेत?
ही योजना सुरू करताना सरकारने काही अटी लागू केल्या होत्या. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलेचे कुटुंबीय उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे आणि वय ६५ वर्षांपेक्षा कमी असावे. मात्र, काही अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे लक्षात आले. त्यामुळे सरकारने सुमारे ५ लाख महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवारांचे मोठे वक्तव्य:
“शेतमजूर महिला, धुणी-भांडी करणाऱ्या महिला, घरकाम करणाऱ्या महिला, भाजीविक्रेते आणि गरीब महिलांसाठी ही योजना आहे. ज्या महिलांचे मासिक उत्पन्न २०,००० रुपयांच्या आत आहे आणि त्यांना इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, त्यांनाच हा लाभ मिळेल,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी अशी अट होती की, फक्त दोन अपत्य असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल, पण नंतर लक्षात आले की काही ४०,००० रुपये मासिक उत्पन्न असलेल्या आणि चारचाकी गाडी असलेल्या महिलाही हा लाभ घेत आहेत. त्यामुळे अशा अपात्र महिलांना वगळण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत दिलेला लाभ परत घेण्यात येणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. “भाऊबीज किंवा राखी पौर्णिमेची भेट परत घेण्याची आपली संस्कृती नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
महिला लाभार्थींनी काय करावे?
जर तुम्ही या योजनेंतर्गत अर्ज केला असेल आणि तुम्ही पात्र असाल, तर तुमच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा होत राहतील. मात्र, जर तुम्ही अपात्र असाल, तर योजनेतून तुम्हाला वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थींनी त्यांच्या पात्रतेची तपासणी करून योजनेचा लाभ घेण्याची खात्री करावी.