तरुणांसाठी मोठी good News ; इटली, जर्मनी, जपानमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी !
Great Job Opportunities in Italy, Germany, and Japan...!!
राज्यपाल आणि कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा आढावा घेतला. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी दोन्ही विद्यापीठांचे सादरीकरण केले. यावेळी राज्यपालांनी कुशल मनुष्यबळाच्या वाढत्या मागणीकडे लक्ष वेधून विद्यापीठांमध्ये विदेशी भाषा शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यास सांगितले.
इटली, जर्मनी, जपान यांसारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विदेशी भाषा शिक्षण सुरू करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केली. राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठाच्या विविध योजनांवर चर्चा केली. आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, ‘कमवा आणि शिका’ योजना, नव्या शैक्षणिक संकुलाचा विकास, रोजगारनिर्मिती, कृषी विद्यापीठासोबत समन्वय, आदिवासींच्या पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. कुलगुरू डॉ. बोकारे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, रोजगारक्षम अभ्यासक्रम, शैक्षणिक वेळापत्रक, वसतिगृह सुविधा, भाषांतर प्रकल्प, विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष, स्वच्छ भारत अभियान, ‘विकसित भारत’ उपक्रम व क्रीडा स्पर्धांबाबत सादरीकरण केले.
नागपूर विद्यापीठाचा शतक महोत्सव आणि संशोधनावर भर
सादरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. विद्यापीठाच्या शतक महोत्सवी वर्षातील विशेष कार्यक्रम व संशोधनाबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी सैन्य प्रशिक्षण सुरू करा!
सैन्यात भरतीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत, मात्र अनेक विद्यार्थ्यांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे विद्यापीठांनी सैन्य प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, जेणेकरून अधिकाधिक युवक सैन्यदलात सहभागी होतील, अशी सूचना राज्यपालांनी केली.
परीक्षा निकाल ३० दिवसांत जाहीर करा!
राज्यपालांनी विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकावरही मार्गदर्शन केले. सर्व विद्यापीठांनी आपले शैक्षणिक वेळापत्रक वेळेवर जाहीर करावे, परीक्षा सत्रनिहाय तारखा स्पष्ट कराव्यात आणि निकाल ३० दिवसांच्या आत प्रकाशित करावा, अशी सूचना त्यांनी दिली. दीक्षांत समारंभाची तारीखही पूर्वनियोजित करून लवकर जाहीर करावी, असे राज्यपाल म्हणाले.