मुंबई महानगरपालिकेत अग्निशमन जवानांचे वेतन रखडले !! कारण जाणून घ्या.
Firefighters' Salary Delayed for Months!!
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात सहा महिन्यांपूर्वी भरती झालेल्या 235 अग्निशमन जवानांना अद्याप वेतन आणि प्रशिक्षण भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे या जवानांवर आर्थिक संकट कोसळले असून, त्यांचा दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. महापालिकेच्या वतीने हे वेतन रखडण्यामागे संबंधित जवानांनी आवश्यक बँक कागदपत्रे सादर न केल्याचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने हा आरोप फेटाळून लावत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवले आहे. त्यांनी वेतन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.
मुंबई अग्निशमन दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याने मोठ्या आपत्ती आणि आगीच्या घटनांमध्ये नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे रक्षण करणे कठीण झाले होते. ही गरज लक्षात घेता 910 रिक्त पदांपैकी 785 अग्निशामकांची भरती सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली. यामध्ये 16 ऑगस्ट 2024 रोजी उर्वरित 235 जवानांची नियुक्ती झाली. मात्र, सहा महिने उलटूनही त्यांचे वेतन आणि काही जणांचा प्रशिक्षण भत्ता रोखून धरल्याने या जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने पालिकेकडे तातडीने वेतन अदा करण्याची मागणी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे हे जवान गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. भरती झालेल्या अग्निशमन जवानांपैकी बहुतांश जण हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील तसेच ग्रामीण भागातील आहेत. आपल्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या हेतूने त्यांनी ही नोकरी स्वीकारली असली तरी सध्या त्यांच्या हातात वेतन नसल्यामुळे त्यांना स्वतःच उदरनिर्वाह करण्यासही कठीण जात आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की काही जवानांकडे एका वेळच्या जेवणासाठीही पैसे उरलेले नाहीत.
या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 4 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने प्रशासनाला लेखी पत्र दिले होते. त्यानंतर 17 डिसेंबर रोजी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्या दालनात झालेल्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे जवानांच्या वेतनास विलंब होत असून, त्यांना त्यांच्या हक्काच्या मिळकतीसाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने त्वरित या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रखडलेले वेतन अदा करावे, अशी मागणी लढाऊ कामगार सेनेचे बाबा कदम यांनी केली आहे.