‘CISF’चे ई-सर्व्हिस बुक पोर्टल; ऑनलाइन सर्व्हिस बुकचा भारतातील पहिला प्रयोग |CISF E Service Book Portal Login
CISF E Service Book Portal Login
CISF E Service Book Portal Login: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ई-सेवा पुस्तक पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पोर्टलमुळे देशभरातील सीआयएसएफ जवानांना आधुनिक आणि सोयीस्कर सेवा मिळणार आहेत. दरवर्षी सीआयएसएफमधून निवृत्त होणाऱ्या सुमारे 2,400 जवानांना या पोर्टलचा विशेष लाभ होईल.
नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी प्रेसमध्ये सीआयएसएफचे 750 जवान कार्यरत आहेत. या जवानांनाही ई-सेवा पुस्तकाचा फायदा होणार आहे. या पोर्टलमुळे जवानांच्या सेवा संबंधित माहिती डिजिटल स्वरूपात सहज उपलब्ध होईल.
सीआयएसएफच्या कमांडंट अमोल चंदनशिवे, उपकमांडंट रिघवेंद्र सावंत आणि रवी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-सेवा पोर्टलमुळे जवानांच्या सेवा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व सुलभता वाढेल.
नाशिकमधील युनिटमध्ये डिजिटायझेशन सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या निवृत्तांना पेन्शन योजनेची सद्यःस्थिती कळण्यासाठी आणि पेन्शन योजना वेगवान करण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त आहे. पोर्टलमुळे निवृत्तांना योग्य वेळेत निवृत्तिवेतनाचा लाभ मिळणे शक्य होणार आहे.
या दलाच्या निवृत्तांना पारंपरिक सेवापुस्तिकेमुळे वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागत होते. या पोर्टलमुळे या सर्वांची बचत होणार आहे. पेन्शन योजनेत पारदर्शीपणा वाढणार आहे. तसेच पेन्शनला विलंब झाल्यास त्याला जबाबदार कोण हेदेखील निश्चित केले जाणार आहे.
पेन्शन योजनेसाठी पाठपुरावा करत बसावे लागणार नाही. या दलाच्या देशभरातील शाखा पोर्टलमुळे केंद्रीय प्रणालीशी जोडणार आहे. कामकाजातील कामाच्या चुकांना प्रतिबंध होणार आहे. सेवापुस्तिकेत त्रुटी किंवा चुका राहिल्यास आणि त्याबाबत शंका उपस्थित केल्यास निवृत्तांच्या शंकांना त्वरित उत्तर मिळणार आहे. त्यामुळे निवृत्तांचा मानसिक ताण कमी होणार आहे. या पोर्टलमुळे आणि ई-सेवा पुस्तिकेमुळे पेन्शन योजनेचे काम कुठपर्यंत आले आहे हे त्वरित समजणे शक्य होणार आहे. पेन्शन योजना कामकाज अधिक आधुनिक होणार आहे. त्यामुळे सरकार, सीआयएसएफ आणि निवृत्त जवान या सर्वांना लाभ होणार आहे. म्हणूनच ई-सर्व्हिस बुकच्या या ऑनलाइन प्रणालीचा फंडा इतरही विभागांना लागू होईल, असा प्रशासकीय सूत्रांचा अंदाज आहे.