लाडक्या बहिणींचा सहावा हफ्ता मिळणार आता २१००/- कि १५००/-? आणि कधी मिळणार..?
Ladki Bahin Yojana 6th Payment Date
विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने, महायुतीला विक्रमी विजय साजरा करणे शक्य झाले. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून, तो खात्यात कधी जमा होणार याची चर्चा रंगत आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आलेल्या या योजने अंतर्गत मुदतीपर्यंत २ कोटी ४० लाख महिला पात्र ठरल्या असून, एक कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार जमा झाले आहेत. दरम्यान, आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने, निवडणुका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणुका संपल्या असून, लाडक्या बहिणींच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार? याची प्रतीक्षा बहिणींना आहे. २९ नोव्हेंबर रोजी बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नयेत म्हणून नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच दिला आहे. २० नोव्हेंबरला मतदान असून, २३ नोव्हेंबरला निकाल असल्याने डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत.
दीड हजार की, २१००?
पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने, लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार का? अशीही चर्चा बहिणींमध्ये रंगत आहे. दरम्यान, हा धोरणात्मक निर्णय असल्याने कॅबिनेटच्या बैठकीतच याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याने, डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिल्यास तो दीड हजारांप्रमाणेच दिला जाण्याची शक्यता आहे.