MPSC च्या १६ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी कोणती परीक्षा होणार!
स्पर्धा परीक्षांची तयारी योग्यरितीने करता यावी, परीक्षा नेमक्या कधी आहेत, याचा अंदाज यावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार १६ परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यात राज्यसेवा पूर्व परीक्षा सप्टेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, २०२४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या बहुतांश परीक्षांचे निकाल, मुख्य परीक्षा अद्यापही झाल्या नसल्याने २०२५चे संभाव्य वेळापत्रक म्हणजे गाजर दाखवण्याचा प्रकार ठरणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
मागील काही वर्षांपासून ‘एमपीएससी’ कडून वेळापत्रकाचे पालन होत नसल्याचे दिसून येते. २०२४च्या परीक्षांचे वेळापत्रकही विस्कळीतच आहे. अनेक पूर्व परीक्षा आणि काही परीक्षांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे उमेदवारांचे पूर्ण वर्ष वाया गेले आहे. आयोगाकडून २०२५ चे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. अखेर आयोगाने शुक्रवारी वेळापत्रक जाहीर केले. पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये येणार असून परीक्षा सप्टेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. यात ९ राजपत्रित सेवांचा समावेश राहणार आहे.
२०२४ च्या परीक्षाच वर्षभर चालणार २०२४ मध्ये जाहीर झालेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि परीक्षाही लांबल्या आहेत. ‘एमपीएससी’च्या दिरंगाईमुळे २०२४ मध्ये जाहीर झालेल्या बहुतांश परीक्षा मे २०२५ पर्यंत चालणार आहेत. काही परीक्षांचे निकाल जाहीर होण्यासही २०२५ उजाळणार आहे. यात राज्यसेवा, संयुक्त परीक्षा, वनसेवा यांचा समावेश आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्पर्धा परीक्षार्थीच्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर्णनात्मक स्वरूपात परीक्षा घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतरही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आयोगाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार आता २०२५पासून राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच होईल, ही बाब स्पष्ट झाली आहे. नवीन पद्धतीने परीक्षा होणार असल्याने अभ्यासाच्या पद्धतीमध्येही बदल होणार आहे.