खुशखबर! नमो शेतकरी योजनेचा आणि किसान सन्मान योजनेचा हप्ता शनिवारी मिळणार!
NAMO SHETKARI YOJANA PAYMENT DATE
सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता शनिवारी (दि. ५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम येथे वितरित केला जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. पीएम किसान योजनेच्या १८ व्या हप्त्याच्या लाभासाठी प्रत्येकी २ हजार रुपये असे एकूण १ हजार ९०० कोटींहून अधिक तर राज्याच्या योजनेमधून प्रत्येकी २ हजार असे एकूण २ हजार कोटींहून अधिक रक्कम ९१ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेतून आतापर्यंत १७ हप्त्यांमध्ये ३२ हजार कोटी तर नमो शेतकरी योजनेतून ६९४९ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास प्रतिवर्षी ६ हजार रुपये प्रत्येकी तीन हप्त्यांत त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न बैंक खात्यात जमा करण्यात येतात. पीएम किसान योजनेंतर्गत ३० सप्टेंबरअखेर राज्यातील जवळपास १ कोटी २० लाख शेतकरी कुटुंबांना १७ हप्त्यांमध्ये सुमारे ३२ हजार कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
याच योजनेच्या धर्तीवर राज्यात २०२३-२४ पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यापासून राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. राज्य सरकारने २०२३-२४ व २०२४-२७ या आर्थिक वर्षांत एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण ९१ लाख ४५ हजार शेतकरी कुटुंबाना ६९६९ कोटी ६८ लाख रुपये देण्यात आले आहेत.