अडीच वर्षांपासून ६०३ उमेदवारांना पोलीस नियुक्ती मिळालेली नाही ! कारण जाणून घ्या
603 Police Appointments Delayed for 2.5 Years!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) १० जानेवारी २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अंतिम निकाल जाहीर करत शिफारस पत्र दिले. मात्र, अद्यापही सरकारकडून या ६०३ उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही. उमेदवारांना मोठ्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत असून, यामुळे नाराजी वाढली आहे.
MPSC ने जून २०२२ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदांच्या ६०३ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार, ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पूर्व परीक्षा पार पडली. तृतीयपंथीय उमेदवारांसाठीही परीक्षा खुली करण्यात आली होती, मात्र त्यासंबंधीचे धोरण न ठरल्याने पूर्व परीक्षेचा निकाल रखडला. उमेदवारांच्या पाठपुराव्यानंतर अखेर निकाल जाहीर झाला. त्यानंतर मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखती संपन्न झाल्या. सप्टेंबर २०२४ मध्ये तात्पुरती निवड यादी जाहीर झाली आणि १० जानेवारी २०२५ रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली.
तथापि, या सर्व प्रक्रियेनंतरही उमेदवारांना नियुक्तीपत्रे मिळालेली नाहीत. यावर मुख्यमंत्री कार्यालयाने प्रतिक्रिया देत, या ६०३ पोलीस उपनिरीक्षकांना एका आठवड्यात नियुक्तीपत्र देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर आता उमेदवारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.