६०० हून अधिक पदवीधर शिक्षक अतिरिक्त?-600 Graduate Teachers to Be Surplus?
600 Graduate Teachers to Be Surplus?
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक नियुक्तीबाबत शासनाने नवा निकष लागू केला असून, ६ ते ८ वीच्या वर्गांत २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये केवळ एकच पदवीधर शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात अशा शाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे अंदाजे ६०० हून अधिक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार आहे. आधीच शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असताना, हा निर्णय शिक्षक व शिक्षण संस्थांसाठी अडचणीचा ठरू शकतो.
शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवत, दोन शिक्षक नियुक्त करण्याची मागणी सातत्याने केली. मंत्रालयात यासंदर्भात चर्चा आणि बैठका झाल्या असूनही शासनाने आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी, लवकरच अनेक शिक्षकांना अतिरिक्त घोषित करण्यात येऊ शकते.
नवीन निकषांमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षक भरती प्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सध्या स्थगित करण्यात आला असून, पुढील नियोजन होईपर्यंत नवीन नियुक्त्या रखडण्याची शक्यता आहे.
शासनाने ‘समूह शाळा’ उपक्रम राबवण्यास प्राधान्य दिल्याने, शिक्षक कपातीचा हा निर्णय त्याचाच एक भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याचा मोठा फटका दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.