मेगा भरती जाहीर !! GHRDC मध्ये ४,००० पदांची भरती; वेतनवाढ आणि सुविधा – मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा!!
4,000 Job Vacancies in GHRDC; Salary Hike and Benefits – CM Sawant’s Announcement!!
गोवा राज्य मानव संसाधन विकास महामंडळात (GHRDC) सध्या ४ हजार कर्मचारी कार्यरत असून, २०२७ पर्यंत ही संख्या ८ हजारांवर नेण्याचा संकल्प आहे. राज्यातील कोणताही अल्पशिक्षित युवक किंवा युवती बेरोजगार राहू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळी येथे सांगितले.
GHRDCच्या वार्षिक दिन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार रूडॉल्फ फर्नांडिस, उपाध्यक्ष दीपक नाईक, व्यवस्थापकीय संचालक गुरुदास देसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, महामंडळाची सुरुवात केवळ ४०० कामगारांनी झाली होती, मात्र आज त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, दोन वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण केलेल्या कामगारांना सरकार कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेणार आहे. त्यासोबतच त्यांना वेतनवाढ, गृहकर्ज सुविधा, बोनस आणि इतर लाभ मिळणार आहेत. महिला कर्मचाऱ्यांसाठी सहा महिन्यांची प्रसूती रजा लागू करण्यात येणार आहे.
महामंडळाच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषत: ३७० जागांसाठी थेट मुलाखतींसाठी हजारो उमेदवार हजर होते. सरकारने कामगारांच्या हिताचा विचार करून वेतनवाढीसह विविध सुविधा जाहीर केल्या आहेत.
महत्वाच्या घोषणांमध्ये कामगारांना सेवेत तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर पोलिस, वनविभाग आणि अग्निशमन दलात १०% आरक्षण, सेवाकर सरकारकडून भरला जाणार, तसेच गेल्या काही वर्षांत कपात झालेली रक्कमही कामगारांना परत मिळणार आहे. याशिवाय, आखाती देशांमध्ये कामासाठी जाणाऱ्या कामगारांसाठी दोन वर्षांची विशेष रजा देण्यात येईल, त्यानंतर ते पुन्हा सेवेत रुजू होऊ शकतात.