राष्ट्रीय आरोग्य अभियान ३४ हजार कर्मचाऱ्यांचे पगार थांबले!-34,000 NHM Staff Unpaid!

34,000 NHM Staff Unpaid!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यभरात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ (एनएचएम) अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे ३४ हजार कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. जिल्ह्यातले जवळपास ७५०-८०० कर्मचारी यामुळे जबरदस्त अडचणीत सापडलेत. डॉक्टर, नर्सेस, टेक्निशियन, आणि कार्यालयीन कर्मचारी एवढ्या महिन्यांपासून मानधनाविना काम करतायत.

34,000 NHM Staff Unpaid!

राज्य शासनाने १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करणार असल्याचं आदेश जानेवारी २०२४ मध्ये काढला, पण अद्याप केवळ ४५० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचंच समायोजन झालं. उरलेल्या हजारोंचं काय, हाच प्रश्न निर्माण झालाय.

त्याच कामाचा तिपटीने कमी पगार!
एनएचएमचे डॉक्टर तेच काम करतायत जे कायमसेवेतील डॉक्टर करतात. पण वेतनात प्रचंड तफावत आहे – कायम डॉक्टरांना लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो, तर एनएचएमच्या डॉक्टरांना फक्त ३५-४० हजार. परिचारिका आणि इतर पदांतही हीच तफावत आहे.

वेतन नाही, आयुष्य धोक्यात
काहींचे घरभाडे थकले, तर कोणाचे होमलोनचे हप्ते थांबलेत. मुलांच्या फी भरणं, किराणा आणणं सुद्धा कठीण झालंय. सरकारकडून निधी न आल्याने पगार रखडलेत, पण हा प्रश्न कधी मिटणार, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

वेतनवाढीतही अन्याय!
राजस्थान, गुजरातसारख्या राज्यांमध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांना दुप्पट वेतनवाढ होते, पण महाराष्ट्रात केवळ ५ टक्केच वाढ होते. त्यामुळे महाराष्ट्रातले कर्मचाऱ्यांचे पगार इतर राज्यांपेक्षा ५ ते १० हजारांनी कमी आहेत, असं राज्य समन्वयक हर्षल रणवरे यांनी सांगितलं.

सरकारच्या ‘वेळकाढूपणामुळे’ कर्मचाऱ्यांची उपासमार!
मुख्यमंत्र्यांनी समायोजनाबाबत सूचना दिल्या तरी अधिकारी वेळकाढूपणा करत असल्याने कर्मचारी हवालदिल झालेत. “वर्षानुवर्षे कमी पगारात काम करतोय, पण अजूनही ना समायोजन, ना वेतन” अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.