मोठा निर्णय ! राज्यात आठ शैक्षणिक विभागामध्ये उभारले जाणार ‘आनंद गुरुकुल ‘ निवासी शाळा !
21st Century Anand Gurukuls in Maharashtra!
महाराष्ट्र शासनाने राज्यातील विद्यार्थ्यांना भविष्यातील गरजांनुसार आधुनिक आणि गुणात्मक शिक्षण देण्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत राज्यभरातील आठ शैक्षणिक विभागांमध्ये ‘आनंद गुरुकुल’ या नावाने निवासी शाळा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या शाळा असणार असून, दर शाळेत २०० विद्यार्थ्यांची पटसंख्या असेल. शिक्षण क्षेत्रात नव्या दिशेने वाटचाल करणारा हा उपक्रम ठरणार आहे.
या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता, २१व्या शतकात आवश्यक ठरणाऱ्या विविध कौशल्यांचा समावेश असलेले शिक्षण दिले जाणार आहे. शासनाने प्रस्तावित केलेल्या अभ्यासक्रमात क्रीडा, कला, संवाद कौशल्य, तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास, आरोग्य सेवा आणि जागतिक पर्यटन यांसारख्या विषयांचा समावेश असेल.
या विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा शोध घेण्यास मदत करेलच, शिवाय त्यांच्यामध्ये विशिष्ट क्षेत्रात करिअर घडविण्याचा आत्मविश्वास निर्माण करेल. या गुरुकुलांमधून तयार होणारे विद्यार्थी केवळ परीक्षांच्या निकालांपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर भविष्यातील जागतिक स्तरावरील स्पर्धेला सामोरे जाण्यास सज्ज असतील.
राज्यातील आठ शैक्षणिक विभाग म्हणजे पुणे, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), अमरावती, नाशिक, कोल्हापूर, मुंबई आणि लातूर. या पैकी धुळे, सातारा, यवतमाळ, अमरावती व संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आधीच शासकीय विद्यानिकेतने कार्यरत आहेत. या ठिकाणीच नव्या ‘आनंद गुरुकुल’ उभारण्याची योजना आहे.
बाकी तीन शैक्षणिक विभागांमध्ये अशा शाळांची निवड केली जाईल जिथे आधीपासून काही पायाभूत सुविधा आहेत आणि ज्यांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक सुधारणा शक्य आहेत. शाळांच्या निवडीसाठी शासनाने समिती स्थापन केली असून, यासाठीची तयारी वेगाने सुरू आहे.
या शाळा आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा सरकारचा मनोदय आहे. त्यामुळे लवकरच या शाळांची अधिकृत घोषणा व प्रवेश प्रक्रिया हाती घेतली जाईल. शासनाचा हा निर्णय शिक्षणाच्या क्षेत्रात अत्यंत दूरदर्शी व परिवर्तनात्मक ठरणार असून, ग्रामीण व अर्धशहरी भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च दर्जाच्या व कौशल्याधारित शिक्षणाची संधी प्राप्त होणार आहे.